Katalin Kariko: Nobel Prize विजेत्या संशोधक ज्यांना विद्यापिठाने काढलं, पण त्यांनी संशोधन सोडलं नाही

Image Source: Dr Kariko social Media X

कोव्हिड-19 विरोधी लस निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलेल्या डॉ. कॅटरिन कारिको आणि डॉ. ड्यू वाइसमन यांना, 2023 चा शरीर विज्ञान किंवा औषधशास्त्रासाठीचा प्रतिष्ठित ‘Nobel Prize’ पुरस्कार जाहीर झालाय.

Dr. Kariko आणि Dr. Drew Weissman यांच्या mRNA (Messenger RNA) तंत्रज्ञानावरील कित्येक दशकांच्या संशोधनामुळेच जगाला कोव्हिड-19 महामारीचा मुकाबला करण्यासाठी प्रभावी लस मिळू शकली. Modenra आणि Pfizer/BioNTech या कंपन्यांनी तयार केलेली कोरोनाविरोधी लस mRNA टॅक्नोलॉजीवर आधारीत होती.

माहितीनुसार, डॉ. कारिको यांच्या संशोधनामुळे Pfizer/BioNTech ने अवघ्या काही तासात तर, Modenra ने दोन दिवसात कोव्हिड विरोधातील लस तयार केली.

नोबेल पुरस्कार समितीच्या सांगण्यानुसार, “डॉ. कारिको आणि डॉ. वाइसमन यांच्या संशोधनामुळे एका भयानक आजाराविरोधात लसनिर्मिती वेगाने होणं शक्य झालं.”

जगभरातील कोट्यावधी लोकांचे प्राण वाचवणाऱ्या डॉ. कॅटरिन कारिको कोण आहेत? mRNA वर संशोधन करत असताना त्यांना अडचणी आल्या? त्यांना त्यांच्या पदावरून कनिष्ठ पदावर का पाठवण्यात आलं? या लेखाच्या माध्यमातून आपण डॉ. कारिको यांच्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

“मला वाटलं कोणीतरी विनोद केला”

नोबेल पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर, Nobel Prize चे मुख्य शास्त्रीय अधिकारी Adam Smith यांनी डॉ. कारिको यांची फोनवरून मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांचा संशोधक बनण्यापर्यंतचा प्रवास, आलेल्या अडचणी आणि इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.

तुम्हाला नोबेल मिळालाय ही बातमी ऐकल्यावर विश्वास बसला? या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. कॅटरिन कारिको म्हणाल्या,

“मला पहिल्यांदा वाटलं, कोणीतरी विनोद केलाय. तुम्हाला माहितीये हल्ली काय होतं ते.”

आतातरी खात्री पटलीये का? यावर डॉ. कारिको पुढे म्हणाल्या, “अजूनही नाही..100 टक्की खात्री नाहीये.”

डॉ. कारिको आणि डॉ. वाइसमन यांच्या संशोधनामुळे mRNA तंत्रज्ञान शरीरातील रोगप्रतिकारशक्तीसोबत कसा संवाद करतंं याची महत्त्वाची माहिती मिळाली. लस विशिष्ठ विषाणूचा मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती देते. 1951 मध्ये मॅक्स थेलर यांना ‘यलो फिवर’ विरोधात लसनिर्मितीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

या मुलाखती दरम्यान डॉ. कारिको यांनी त्यांच्या आईची एक आठवण सांगितली. त्या म्हणतात,

“माझी आणि नेहमी नोबेल पुरस्काराची घोषणा ऐकायची. मला म्हणायची. पुढच्या आठवड्यात तुला मिळेल पुरस्कार. मी खूप हसायचे. मी प्रोफेसर नव्हते. माझी टीम नव्हती. मी तिला तू ऐकू नको असं सांगायचे.”

कोण आहेत Dr Katalin Kariko?

68 वर्षांच्या डॉ. कारिको मूळच्या हंगेरीच्या. त्यांचा जन्म 1955 साली हंगेरीच्या Szolnok शहरात झाला. त्यांचे वडील व्यवसायाने खाटीक होते. विज्ञानाची प्रचंड आवड असलेल्या डॉ. कारिको यांनी 1982 साली Szeged’s University मधून PhD ची पदवी मिळवली. त्यानंतर Hungarian Academy of Sciences मध्ये 1985 पर्यंत postdoctoral research चं काम केलं.

अमेरिकेत आल्यानंतर फिलाडेल्फियातील टेंपल विद्यापिठात postdoctoral research चं काम केलं. 1989 मध्ये त्यांची पेन्सलव्हेनिया विद्यापिठात सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. याठिकाणी डॉ. कारिको 2013 पर्यंत होत्या. त्यानंतर त्यांनी औषधनिर्मिती करणारी कंपनी BioNTech मध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केलंय. सद्य स्थितीत त्या Szeged विद्यापिठात प्राध्यपक आणि पेन्सलव्हेनिया विद्यापिठाच्या Perelman School of Medicine मध्ये Adjunct Professor आहेत.

“मला विद्यापिठातून काढून टाकलं”डॉ. कारिको

1989 मध्ये डॉ. कारिको यांनी mRNA (Messenger RNA) तंत्रज्ञानावर काम सुरू केलं होतं. त्यांचा नोबेल पुरस्कारापर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. कारण, या प्रवासात त्यांच्या संशोधनावर विश्वास न ठेवणारे बरेच होते. ज्यांनी त्यांना या संशोधनाचा काय फायदा? यापेक्षा दुसरं काहीतरी कर, असं म्हणत त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला.

“मला संशोधनासाठी कोणीच ग्रॅंट देत नव्हतं,” डॉ. कारिको यांनी CNBC Make it शी बोलताना खुलाला केलाय.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त त्यांच्यासोबतच्या संशोधकांनी नाही. तर, ज्या विद्यापिठात त्या काम करत होत्या. त्या विद्यापिठानेदेखील त्यांना योग्य वागणूक दिली नाही. नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर Adam Smith यांना दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात,

“तुम्हाला 10 वर्षांपूर्वीचं माहिती असेल. तर मी ऑक्टोबरमध्ये इथे होते. कारण मला विद्यापिठातून काढून टाकण्यात आलं होतं. मला जबरदस्तीने निवृत्ती घेण्यास भाग पाडण्यात आलं.”

डॉ. कारिको यांना त्यांच्या पतीने त्यांना जर्मनीला जाण्याचा सल्ला दिला. ज्यानंतर त्यांनी BioNTech कंपनीत त्यांनी काम सुरू केलं.

CNBC Make it शी बोलताना त्यांनी त्यांना विद्यापिठात कशी वागणूक मिळाली यावर मन मोकळं केलंय. त्या म्हणतात, “मला चार वेळा demote करण्यात आलं.

डॉ. कारिको पेन्सव्हेनिया विद्यापिठात संशोधन सहाय्यक म्हणून काम करत होत्या. विद्यापिठाने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिल्याचं CNBC Make it च्या बातमीत सांगण्यात आलंय.

संशोधकांनी डॉ. कारिको यांना साथ दिली नाही. पण त्यांनी त्यांचं धेय्य सोडलं नाही. पेन्लव्हेनिया विद्यापिठातच त्यांची डॉ. ड्यू वाइसमन यांच्याशी भेट झाली. या दोघांनी एकत्र संशोधन सुरू केलं.

mRNA (Messenger RNA) म्हणजे काय?

Dr. Kariko आणि Dr. Drew Weissman यांच्या mRNA (Messenger RNA) तंत्रज्ञानावरील कित्येक दशकांच्या संशोधनाचं फळ म्हणजे कोव्हिड-19 विरोधी लस. पण ज्या तंत्रज्ञानासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला, ते mRNA आहे काय? आपण सोप्या शब्दात समजावून घेऊया.

mRNA म्हणजे सोप्या शब्दात Messenger RNA. शरीरातील पेशींमध्ये जेनेटीक माहिती DNA (Deoxyribonucleic acid) च्या स्वरूपात कोड केली जाते. ही माहिती Messenger RNA कडे ट्रान्सफर केली जाते. ज्याच्या मदतीने प्रोटीन तयार केलं जातं.

बीबीसीच्या माहितीनुसार, mRNA एक सिंगल स्ट्रॅन्डेड मॉलिक्युल आहे. DNA कडून मिळालेला जेनेटीक कोड, mRNA पेशींच्या प्रोटीन बनवणाऱ्या फॅक्ट्रीकडे जाऊन पोहोचवतो. mRNA शिवाय तुमचा जेनेटीक कोड वापरला जाणार नाही, प्रोटीन बनणार नाहीत आणि शरीर चालणार नाही.

Fondation L’Oréal ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. कॅटरिन कारिको यांनी mRNA चं काम अत्यंत सोप्या शब्दात समजावून सांगितलं आहे.

“लाईफ म्हणजे DNA आणि प्रोटीन. यांच्या मधला घटक ज्याचा शोध 60 वर्षांपूर्वी लागला ते म्हणजे Messenger RNA. जे प्रोटीनसाठी कोड करतं. न्यूक्लाईकडून माहिती घेऊन ते प्रोटीन ज्या ठिकाणी तयार होतं, तिथे घेऊन जातं. असे प्रोटीन तयार होतात.”

डॉ. कारिको आणि डॉ. वाइसमन यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि त्यांनी 2005 मध्ये याबाबतचं एक संशोधन जगासमोर आणलं.

mRNA काम कशी करते?

कोव्हिड-19 लशीचं उदाहरण घेऊन हे समजावून घेऊ.

  • संशोधक व्हायरसच्या जेनेटीक कोडची मदत घेऊन लस तयार करतात. ही लस लोकांना दिली जाते.
  • लस पेशींमध्ये शिरते आणि पेशींना कोरोना व्हायरसचं स्पाईक प्रोटीन तयार करण्यास सांगते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सतर्क होते. एंटीबॉडीज तयार होण्यास सुरूवात होते आणि T-cells अॅक्टिव्ह होतात. स्पाईक प्रोटीन असलेल्या पेशींना नष्ट करण्यासाठी
  • त्यानंतर कोणाला कोरोना व्हायरसची लागण झाली तर एंटीबॉडीज आणि T-cells व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होतात.

(सोर्स- Nature)

तर अमेरिकेची सर्वोच्च आरोग्य संघटना सेंटर फॉर डिसिज एंड प्रिव्हेंनशनच्या माहितीनुसार,

लशीमध्ये mRNA एका कोटिंगमध्ये ठेवण्यात येतं. जेणेकरून डिलिव्हरी सोपी होते आणि शरीरापासून त्याला काही धोका पोहोचणार नाही. लशीतील mRNA पेशींना स्पाईक प्रोटीनची कॉपी बनवण्यासाठई शिकवतं. जेणेकरून व्हायरसचा संसर्ग झाल्यास मुकाबला करता येतो.

mRNA वर आधारित लस निर्मितीवर विविध कंपन्यांनी 2010 पासून काम सुरू केलं. झिका आणि कोरोनाशी मिळत्याजुळत्या MERS-CoV वर काम सुरू झालं. कोरोनाच्या महामारीनंतर लशीवर काम सुरू झालं आणि डिसेंबर 2020 मध्ये लशीला मान्यता मिळाली.

खडतर प्रयत्नांनंतर डॉ. कारिको यांना नोबेल पुरस्कार मिळाला. पण त्यांच्या संघर्षाची कहाणी प्रत्येक संशोधकासाठी एक प्रेरणादायी आहे. CNBC Make it शी बोलताना त्या म्हणतात,

तुम्ही जे बदलू शकत नाही. त्यावर विचार करू नका. तुम्हाला तर काढून टाकण्यात आलं, तर स्वत:ला दोष देऊ नका. पुढे काय यावर विचार करा. कारण ते तुम्ही बदलू शकता.

Leave a comment