रशियाने कॅन्सरची वाढ रोकणारी कॅन्सरविरोधी लस तयार केल्याचा दावा केलाय. ही लस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देण्यात येणार नाहीये. तर, 2025 पासून कॅन्सरग्रस्त रुग्णांना देण्यात येईल अशी माहिती रशियन सरकारने दिलीये. mRNA तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात आलेली ही लस, रुग्णांना मोफत दिली जाणार आहे. रेडियो रशियाशी बोलताना आरोग्य मंत्रालयाच्या रेडियोलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे महासंचालक अॅन्ड्रे कापरिन यांनी ही माहिती दिलीये.
रशियाच्या गमालेया नॅशनल रिसर्च सेंटरमध्ये ही कॅन्सरविरोधी लस तयार करण्यात येत आहे. याच इन्स्टिट्युटने कोव्हिड-१९ विरोधातील स्पूटनिक लस तयार केली होती. २०२२ मध्ये या लशीवर संशोघन सुरू झालं. ही लस तयार करण्यात रशियातील विविध संशोधन संस्थानी काम केलंय. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीदेखील काही महिन्यांपूर्वी कॅन्सरविरोधी लशीबाबत वक्तव्य केलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, लशीच्या प्रत्येक डोससाठी 3,00,000 रूबल्स म्हणजे 2,869 अमेरिकन डॉलर्स खर्च येणार आहे. रशियन सरकार रुग्णांना ही लस मोफत देण्याचा खर्च उचलणार आहे.
कॅन्सरविरोधी लशीबाबत रशियाचा दावा काय?
बॅक्टेरिया आणि व्हायरसविरोधात अनेक लशी उपलब्ध आहेत. रोगप्रतिबंधात्मक उपाय म्हणून या लशी दिल्या जातात. पण कॅन्सरविरोधी लस निर्मिती खूप कठीण आहे. याचं कारण, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील कॅन्सरचा ट्युमर वेगळा असतो, याचे मार्कर वेगळे असतात. त्यामुळे कॅन्सरविरोधात लसनिर्मिती मोठं आव्हान आहे.
रशियाचा दावा
१- गमालेया नॅशनल रिसर्च सेंटरचे संचालक एलेक्झान्डर गिन्ट्सबर्ग सांगतात, प्री-क्लिनिकल ट्रायलमध्ये लस ट्युमरची वाढ रोकण्यामध्ये आणि कॅन्सरचा फैलाव रोकण्यामध्ये प्रभावी असल्याचं दिसून आलं.
२- संशोधक AI चा (आर्टिफिशिअल इंटेलिजेंन्स) वापर करून प्रत्येक व्यक्तीसाठी personalize cancer vaccine तयार करणार. यामुळे कॅन्सरविरोधी लस तयार करण्यासाठी लागणारा वेळ एका तासापेक्षा कमी करता येईल.
३- ही युनिव्हर्सल नाही, personalize व्हॅक्सीन आहे प्रत्येक कॅन्सर आणि रुग्णांसाठी.
४- ही थेरप्युटीक लस आहे. ही कॅन्सरपासून प्रतिबंध करत नाही तर कॅन्सर पेशींवर हल्लाकरून त्यांना टार्गेट करते.
दावा केला पण पुरावे कुठे?
रशियाचा दावा खरा असेल तर, ही गेल्या दशकातील आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठी घडामोडी म्हणावी लागेल. पण या दाव्याबाबत जगभरातील डॉक्टर्स आणि संशोधकांनी सावधगिरीची भूमिका घेतलीये. कॅन्सरविरोधी लशीच्या दाव्याबाबत रशियाने अजूनही पुरावे दिलेले नाहीत. माझं काही कॅन्सर सर्जनसोबत बोलणं झालं. ते म्हणाले,
१- या लशीबाबत फारशी माहिती उपलब्ध नाहीये. लशीचं नावही सांगण्यात आलेलं नाही.
२- प्री-क्लिनिकल ट्रायल आणि क्लिनिकल ट्रायलचा डेटा संशोधकांना अभ्यासाठी उपलब्ध नाही.
३- मेडिकल जर्नलमध्ये याबाबत माहिती नाही.
४- प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील कॅन्सर ट्युमर आणि त्याचे मार्कर वेगळे असतात. त्यामुळे कोणत्या कॅन्सरविरोधात प्रभावी याची माहिती नाही.
जगभरात कॅन्सरविरोधी लस तयार करण्यासाठी हजारो संशोधक दिवसरात्र एक करतायत. पण कोणाला ब्रेक-थ्रू मिळालेला नाही. कोरोनाविरोधी लस तयार करणाऱ्या मॉडेर्ना अणि फायझरसारख्या कंपन्या कॅन्सरविरोधी लस निर्मितीसाठी प्रयत्न करतायत. पण यश अजूनही मिळालेलं नाही.
रशियन न्यूज एजेंसी TASS शी बोलताना गमालेया नॅशनल रिसर्च सेंटरचे एलेक्झान्डर गिन्ट्सबर्ग म्हणाले, प्री-क्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस कॅन्सरच्या ट्युमरची वाढ रोकण्यामध्ये आणि कॅन्सरचा फैलाव रोकण्यामध्ये प्रभावी असल्याचं दिसून आलंय.
mRNA कसं काम करतं?
mRNA म्हणजे सोप्या शब्दात मेसेंजर RNA. सामान्यत: लस तयार करण्यासाठी कमकुवत किंवा इनअक्टिव्ह व्हायरसचा वापर केला जातो. याउलट mRNA तंत्रज्ञानाने बनवलेली लस शरीरात जेनेटिक instructions पाठवते. पेशींमध्ये जेनेटिक माहिती DNA च्या स्वरूपात कोड केली जाते. ही माहिती मेसेंजर RNA कडे ट्रान्सफर होते ज्याच्या मदतीने प्रोटीन तयार केलं जातं. DNAकडून मिळालेला कोड mRNA प्रोटीन बनवणाऱ्या फॅक्ट्रीकडे पोहोचवतो. ज्यामुळे पेशींमध्ये विशिष्ट प्रकारचं कॅन्सर प्रोटीन तयार होतं. याला antigen म्हणतात. रोगप्रतिकारशक्ती या प्रोटीनला ओळखून त्याविरोधात antibodies तयार करते. ज्यावेळी कॅन्सर ट्युमरवर हे antigen डिटेक्ट होतं, रोगप्रतिकारशक्ती यावर हल्ला चढवते. रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी mRNA नावाच्या अनुवांशिक कोडचा रेणू वापरतात. विषाणूचा हल्ला झाल्यानंतर प्रतिकार करण्यासाठी शरीराला तयार करण्यास ते मदत करतं.
माझ्या रिसर्चमध्ये काय आढळलं?
रशियाने केलेल्या या दाव्याबाबत डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर मी स्वत: माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
रशियन सरकारच्या वेबसाइटवर सर्च करूनही अधिकृत माहिती मिळाली नाही.
कॅन्सरबाबत संशोधन छापणाऱ्या जर्नलमध्येही या लशीबाबत माहिती नव्हती.
ओपन सोर्स मटेरिअलमध्ये रशियाच्या या कॅन्सरविरोधी लशीबाबत डेटा सापडला नाही.
सोशल मिडीयावर गमालेया नॅशनल रिसर्च सेंटरचे संचालक एलेक्झान्डर गिन्ट्सबर्ग यांनी या लशीबाबत दिलेल्या काही मुलाखती उपलब्ध आहेत.
कोण करतंय कॅन्सरविरोधी लशीवर संशोधन?
कोरोना व्हायरसविरोधात लस बनवणाऱ्या मॉडेर्ना, फायझर आणि बायो-एन-टेकसारख्या कंपन्या कॅन्सविरोधी लशीवर संशोधन करत आहेत. गेल्या काही वर्षात कॅन्सरविरोधी लशीवर अनेक संशोधन झाली. पण यामध्ये यश मिळालेलं नाही. महिलांना होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरविरोधात प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. वेबएमडीच्या माहितीनुसार, यूके आणि अमेरिकेत फुफ्फुसांच्या कॅन्सरविरोधात mRNA वर आधारीत BNT116 लशीवर संशोधन सुरू आहे.

Image Source: National Medical Research Radiological Center of the Ministry of Health of the Russian Fedaration