वयाच्या तिशी, चाळीशीतली वर्ष म्हणजे डोक्यावर अपेक्षांचं ओझं, वाढलेली जबाबदारी, काम करण्याचे दिवस, स्वत:ला प्रूव्ह करण्यासाठी सुरू असलेली दिवसरात्र धडपड. थोडक्यात काय तिशी-चाळीशी म्हणजे the most productive years of life. आता काम नाही करायचं? मग कधी? हीच कामाची खरी वेळ..असं स्वत:ला समजावून आपण व्यावसायिक स्पर्धेत पळू लागतो.
आयुष्याचं हे दशक सुरू कधी होतं आणि कधी चाळीशी उलटते, हे कामाच्या व्यापात कळत नाही. कामाच्या धडपडीत आपण इतके गुंतलेलो असतो की आरोग्यावर फारसं लक्ष दिलं जात नाही. खरंतर, आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो असंच म्हणावं लागेल. स्ट्रेस, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, सतत बसून काम, व्यायामाचा अभाव, बदललेली जीवनशैली यामुळे हृदयरोग, उच्चरक्तदाब, डायबिटीस यांसारखे आजार याच वयात हळूहळू सुरू होतात.
तिशी-चाळीशीत कोणत्या तपासण्या कराव्यात?
वयाच्या तिशी-चाळीशीत शरीरात सतत बदल होत असतात. त्यामुळे तज्ज्ञ सांगतात की, वयाच्या तिशीपासूनच आरोग्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. आजारांना दूर ठेवण्यासोबतच नियमित आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे. या Blog च्या माध्यमातून कोणत्या आरोग्य चाचण्या महत्त्वाच्या आहेत. याची माहिती मी देण्याचा प्रयत्न केलाय.
रक्तदाब तपासणी- Blood pressure
घरीच करता येण्यासारखी, अत्यंत सोपी पण महत्त्वाची चाचणी. उच्चरक्तदाब हृदयविकाराचा धोका असल्याचा संकेत आहे. त्यामुळे वेळोवेळी रक्तदाब तपासणी महत्त्वाची ठरू शकते.
120 80 नॉर्मल
130-139 80-89 स्टेज-1 Hypertension
140+ 90+ स्टेज-2 Hypertension
((Source- MayoClinic))
कामाचा ताण, सतत धावपळ, स्ट्रेस आणि इतर कारणांमुळे रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. लक्ष न दिल्यास हळूहळू वाढत जातो. त्यामुळे वयाच्या तिशीत पोहोचलो की नियमित रक्तदाब तपासणी केली पाहिजे. मायो क्लिनिकच्या माहितीनुसार,
- 18-39 वर्ष वयोगटातील रक्तदाब सामान्य असणाऱ्यांनी आणि हृदयरोगाचा त्रास नसलेल्यांनी दर 2-5 वर्षात Blood pressure तपासून घेतलं पाहिजे.
- 40 वर्षावरील आणि उच्चरक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असलेल्यांनी दरवर्षी रक्ततपासणी केली पाहिजे.
Blood pressure ची डिजिटल मशिन बाजारात सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी हे मशिन असणं महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. उच्चरक्तदाब आता पन्नाशीतला नाही, तर तिशीतला आजार बनलाय.
रक्ततपासणी
खूप जास्त ताप, इन्फेक्शन असेल तर डॉक्टर आपल्याला सांगतात CBC करून घे आणि दाखव. CBC म्हणजे ‘Complete Blood Count’. अमेरिकेतील क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार, ही टेस्ट केल्यामुळे रक्तातील लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, हिमोग्लॉबिन आणि प्लेटलेट्सची माहिती मिळते.
ही टेस्ट एक रुटीन तपासणी आहे. क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार, शरीरात काही संसर्ग असल्यास, औषधं सुरू असल्यास, अनिमिया आणि कॅन्सर असल्यास या टेस्टचे रिझल्ट वेगळे दिसून येतात. थोडक्यात, ही टेस्ट केल्यामुळे हे आजार ओळखता येतात.
भारतात महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण खूप मोठं आहे. यात रक्तातील लालपेशींमधील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे पेशींपर्यंत योग्य ऑक्सिजन पुरवठा होत नाही. त्यामुळे वयाच्या तिशीत महिला किंवा पुरुष ही टेस्ट करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
लिपिड प्रोफाईल
अत्यंत महत्त्वाची तपासणी. लिपिड प्रोफाईल केल्यामुळे रक्तातील चरबीची – टोटल कोलेस्ट्रोल, HDL कोलेस्ट्रोल, LDL कोलेस्ट्रोल, ट्रायग्लिसराईड्स आणि इतर माहिती मिळते. शरीरात किती कोलेस्ट्रोल आहे यावरून हृदयरोगाचा धोका किती आहे समजतं.
क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार,
- HDL कोलेस्ट्रोल शरीरासाठी चांगलं असतं. याला “good” cholesterol म्हणतात. याची मात्रा 60 पेक्षा जास्त असायला हवी.
- LDL कोलेस्ट्रोल, ज्याला बॅड कोलेस्ट्रोल म्हणतात. त्याची मात्रा 100 पेक्षा कमी असायला हवी.
तज्ज्ञ सांगतात, तिशी आणि चाळीशीच्या दरम्यान रिपोर्ट सामान्य असले तरी दोन वर्षातून एकदा लिपिड प्राफाईल केली पाहिजे. जर तुम्ही लठ्ठ असाल, मधुमेह असेल आणि हृदयरोगाचा त्रास असेल तर ही चाचणी दरवर्षी करून घ्या.
Blood Sugar Test – रक्तातील साखरेची तपासणी
तिशीतली आणखी एक महत्त्वाची टेस्ट. या वयात मधुमेह किंवा डायबिटीस होण्याचा धोका जास्त असतो. याचं कारण प्रामुख्याने आपल्या चुकीच्या सवयी. शरीरात सारखेचं प्रमाण जास्त झालं की डायबिटीस होतो. त्यामुळे मधुमेह आहे का नाही, हे ओळखण्यासाठी Blood Sugar Test केली जाते. यात अंशपोटी सकाळी काही न खाता-पिता आणि जेवणानंतर रक्ततपासणी केली जाते.
अमेरिकेतील आरोग्य संस्था CDC च्या माहितीनुसार,
- रक्तातील साखरेचं प्रमाण 99 पेक्षा कमी असेल तर सामान्य मानलं जातं.
- साखरेचं प्रमाण 100 ते 125 मधे असेल तर याला ‘प्री-डायबेटीक’ म्हणतात.
- शरीरातील साखर 126 पेक्षा जास्त असेल, तर मधूमेह झाल्याचं निदान करण्यात येतं
2-3 महिन्यातील सरासरी सारखेची पातळी किती आहे हे माहित करण्यासाठी HBA1C टेस्ट केली जाते.
- सामान्य: 5.7% पेक्षा कमी
- प्री-डायबेटीक: 5.7–6.4%
- मधुमेह: 6.5% or above
((Source: https://www.cdc.gov/diabetes/diabetes-testing/index.html))
लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT- Liver Function Test)
या वयात खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. जंक फूड, बाहेर जवळपास रोज काहीतरी खाणं होतं. ही टेस्ट यकृताचं कार्य योग्य सुरू आहे का नाही याची माहिती देते. यकृताची काम करण्याची क्षमता कमी झाली आहे का? हे कळतं.
हेपेटायटिस-बी, हेपेटायटिस-सी, फॅटी लिव्हर या आजारांचं योग्य आणि वेळीच निदानासाठी ही टेस्ट महत्त्वाची आहे.
Body Mass Index – BMI
आपली उंची आणि वजन यांच्यानुसार आपल्या शरीरात चरबी किंवा फॅट किती आहे याची माहिती मिळवण्यासाठी ही टेस्ट केली जाते. BMI जास्त असेल तर आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. लठ्ठ लोकांचा BMI खूप जास्त असतो. शरीरात चरबी जास्त असेल तर लठ्ठपणा किंवा वैद्यकीय भाषेत Obesity म्हणतात. लठ्ठपणामुळे हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर आणि इतर आजार होण्याचा धोका असतो.
पॅप स्मिअर टेस्ट (Pap Smear Test)
गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या (cervical cancer) निदानासाठी Pap Smear Test खूप महत्त्वाची आहे. यामुळे जीव वाचू शकतो. क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार, Dr. George Papanicolaou यांनी या टेस्टचा शोध लावला. ते सांगतात, गर्भाशय असलेल्या 21 ते 30 वयोगटातील महिलांनी Pap Smear Test तीन वर्षातून एकदा केली पाहिजे. तर 30 ते 65 वयोगटातील महिलांनी पाच वर्षातून एकदा ही चाचणी केली पाहिजे.
व्हिटॅमिन-D टेस्ट करणं का महत्त्वाचं?
हाडांच्या मजबूतीसाठी व्हिटॅमिन-D अत्यंत महत्त्वाचं आहे. हाडं कमकुवत झाली तर अनेक आजार होण्याची शक्यता असते. वर्क फ्रॉम होम, कायम ऑफिसमध्ये डेस्टवर्क आणि उन्हात कमी गेल्यामुळे शरीराला आवश्यक व्हिटॅमिन-D मिळत नाही. वय हळूहळू वाढत जातं आणि हाडं कमकुवत होऊ लागतात. सतत धावपळीमुळे तिशी-चाळीशीत सांधे दुखी सुरू होते. हाडं ठिसूळ झाल्यामुळे ‘ऑस्ट्रीओपोरोसिस’सारखे आजार उद्भवतात. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी व्हिटॅमिन-D आणि कॅल्शिअम महत्त्वाचं आहे.
क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार, व्हिटॅमिन-D ची कमतरता हा जगभरात एक मोठा प्रश्न आहे. जगभरात जवळपास 1 billion लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन-D कमी आहे.
Urine Test
युरिनरी टॅक्ट इंन्फेक्शन, किडनीचा आजार किंवा मधुमेह यांसारख्या आजारांच्या निदानासाठी युरिन टेस्ट महत्त्वाची आहे. युरिन टेस्टमध्ये लघवीचा रंग, त्यात असलेले घटक यांची तपासणी केली जाते. ही एक रुटीन टेस्ट आहे. त्यामुळे नक्की करून घ्या असा सल्ला डॉक्टर देतात.
किडनी तपासणी
शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकण्याचं काम किडनीचं आहे. पण काही कारणांमुळे किडनीचं कार्य कमी होतं किंवा किडनी योग्य काम करत नाही. किडनी तपासणीत किडनीचं कार्य कसं सरू आहे याची माहिती मिळते.
थायरॉईड
अमेरिकन थायरॉईड असोसिएशनच्या सांगण्यानुसार, प्रौढांनी वयाच्या 35 शीत ही टेस्ट करून घ्यावी आणि त्यानंतर दर पाच वर्षांनी ही टेस्ट करावी. वयाच्या तिशीत अनेकांना थायरॉईड डिटेक्ट होतो. वजन अचानक वाढतं किंवा कमी होतं रक्त तपासणी करून शरीरात थायरॉईड योग्य प्रमाणात आहे का नाही हे तपासून पहाता येतं.
ECG Test
वयाच्या 35शी नंतर ही टेस्ट करून घ्या असा सल्ला डॉक्टर देतात. हृदयाचं कार्य योग्य सुरू आहे का नाही याची माहिती ECG Test मध्ये कळते. ECG Test नॉर्मल असेल तर वर्षातून एकदा करा असं तज्ज्ञ म्हणतात.
((This blog is created using information gathered from various online sources. For more personalized and detailed information, please consult your doctor or medical examiner. This is for information purpose only))

Image Source: Freepik