अस्थमाचा त्रास असलेल्यांसाठी उपयुक्त उष्ट्रासन

@ Mayank Bhagwat

उष्ट्रासन, backward bending आसन आहे. याला इंग्रजीमध्ये ‘कॅमल पोज’ असं म्हणतात. या आसनात chest open होते. lungs (फुफ्फुसं) expand होतात. दिर्घ श्वास घेतल्याने ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर शरीरात घेतला जातो. त्यामुळे अस्थमाचा त्रास असलेल्यांसाठी उष्ट्रासन अत्यंत उपयुक्त आहे.

उष्ट्रासन करण्याच्या 5 योग्य steps

वज्रासनात बसा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा.

गुडघ्यांवर उभे रहा. यावेळी दोन्ही हात शरीराच्या बाजूला असतील.

दोन्ही पायांचे तळवे आणि गुडघे जोडलेले असतील. पायांमध्ये अंतर ठेवल्याने आसनाची पोझिशन सुखकर होत असेल तर, पायांचे तळवे आणि गुडघ्यांमध्ये खांद्याएवढं अंतर ठेवावं.

तळव्यांचा वरच भाग खाली आणि खालचा भाग वर असेल याची खात्री करा.

त्यानंतर पाठीत वाकून उजव्या हाताने उजव्या पायाची टाच आणि डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडावी. हे करत असताना स्नायूंवर खूप ताण येणार नाही याची काळजी घ्या.

त्यानंतर कमरेचं हाड पुढे सरकवावं. डोकं आणि पाठीचा कणा मागच्या बाजूस वाकवावा. पाय सरळ रेषेत असतील याची काळजी घ्यावी. शरीर शिथिल सोडावं. सामान्य पद्धतीने श्वासोच्छवास सुरू ठेवावा.

आसनाच्या शेवटच्या पोझिशनमध्ये पाच ते दहा श्वास रहावं. या स्थितीमध्ये तुमचा अवेअरनेस पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूला, घसा आणि ओटीपोटावर असावा.

आसन सोडताना श्वास घेत पायाच्या तळव्यांची पकड सोडत पुन्हा गुडघ्यांवर बसावं. त्यानंतर मूळ स्थिती म्हणजे वज्रासनात परत यावं.

उष्ट्रासनाचे फायदे?

उष्ट्रासन पचनसंस्था आणि रिप्रॉडक्टिव्ह प्रणालीला चालना देणारं आसन आहे.

मान मागच्या बाजूला झुकवल्याने चांगला स्ट्रेच मिळतो. गळ्यातील थायरॉईड ग्रंथींवर या आसनाचा चांगला परिणाम दिसून येतो.

या आसनात तुमची चेस्ट म्हणजे छाती छान ओपन होते. त्यामुळे अस्थमा असलेल्या रुग्णांसाठी हे आसन उपयुक्त आहे.

या आसनात पोट आणि आतड्यांना चांगला स्ट्रेच मिळतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांना मदत मिळते.

उष्ट्रासन कोणी करू नये?

पाठीचे आजार किंवा अत्यंत तीव्र पाठदुखीचा त्रास असलेल्यांनी हे आसन करू नये.

योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाशिवाय हे आसन करू नये.

उष्ट्रासनाचा आणखी एक प्रकार किंवा व्हेरिएशन म्हणजे अर्ध उष्ट्रासन किंवा ‘Half Camel Pose’

यामध्ये दोन्ही हातांनी पायाच्या टाचा न पकडता उजव्या किंवा डाव्या, एकच हाताने टाच पकडावी आणि दुसरा हात खांद्यांच्या उंचीपर्यंत वर उचलावा. पण हा व्हेरिएशन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. ती म्हणजे, उजव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडावी.

अर्ध उष्ट्रासन करण्याची सोपी पद्धत

वज्रासनात बसा आणि दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा.

दोन्ही गुडघे आणि पायात अंतर ठेउन मग गुडघ्यांवर उभे रहा. दोन्ही हात वर उचलून खांद्याच्या उंचीवर आणा.

त्यानंतर उजव्या बाजूला हलकं वळून, उजव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडा. हे करत असताना तुमचा डावा हात समोरच्या बाजूला थोडा उचलून वर घ्या.

मान जास्त मागे न झुकवता लक्ष डाव्या हातावर केंद्रीत करा. शक्य असेल तर आसनाच्या शेवटच्या पोझिशनमध्ये पाच ते दहा श्वास रहावं.

उष्ट्रासनाप्रमाणेच पाठीचा त्रास असलेल्यांनी हे आसन करू नये.

Leave a comment