पोटात गॅस झालाय? मग पवनमुक्तासन करा

पवनमुक्तासनाला ‘Wind release pose’ म्हटलं जातं. या आसनाच्या सरावामुळे पोटातील गॅसेस बाहेर पडतात आणि पोटपुगीची समस्या कमी होते. योग अभ्यास सुरू करणाऱ्या सर्वांसाठी हे अत्यंत उपयुक्त आसन आहे. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

पवनमुक्तासन करण्याची योग्य पद्धत

पाठीवर झोपा. पाय एकत्र आणि समोरच्या दिशेने असतील. हात शरीराच्या बाजूला असतील.

दिर्घ श्वास घ्या आणि आसन करण्यासाठी तयार व्हा. श्वास घेतल्यानंतर पाय हळूहळू वर उचला आणि गुडघ्यातून वाकवा.

गुडघे छातीजवळ आणा आणि दोन्ही हातांनी गुडघ्यांना घट्ट मिठी मारा.

गुडघे जमेल तेवढं छातीजवळ ओढण्याचा प्रयत्न करा आणि छातीजवळ घट्ट पकडून ठेवा. श्वास सोडत डोकं आणि छाती वर उचला.

नाक दोन्ही गुडघ्यांजवळ आणण्याचा प्रयत्न करा. पाय रिलॅक्स असद्यात.

ही पोझिशन 5-10 सामान्य श्वास होल्ड करण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत पोट दाबलेलं असल्याने दिर्घ श्वास घेणं शक्य होणार नाही.

आसन सोडताना पहिल्यांदा डोकं आणि छाती जमिनीवर ठेवा आणि त्यानंतर पाय सुरूवातीच्या पोझिशनमध्ये आणा.

पवनमुक्तासनाचे फायदे

पवनमुक्तासनात पोटावर प्रेशर आल्यामुळे पोट आणि आतड्यात अडकलेले गॅस बाहेर पडतात.

या आसनाचा नियमित सराव केल्यामुळे पोटपुगीचा त्रास कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते.

पोटाचे स्नायू मजबूत होतात.

ओटीपोटाच्या भागात रक्तपुरवठा चांगला होण्यास मदत होते.

लोअर बॅकमध्ये ताण असल्यास कमी होतो.

हे आसन कोणी करू नये?

ज्यांना पोटाचे आजार किंवा दुखापत झालीये त्यांनी हे आसन करू नये. पोटात अल्सर असल्यास आणि पाठदुखीचा त्रास असल्यास हे आसन टाळावं.

हर्निया आणि मानदुखीचा त्रास असलेल्यांनी हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये.

Leave a comment