जेवण झाल्यानंतर वज्रासनात बसण्याचे 5 फायदे

@babbamayank

रात्री जेवण झाल्यानंतर आपली पावलं थेट सोफा, बेड किंवा आराम खुर्चीकडे वळतात. बरोबर ना! जेवणानंतर लगेच झोप किंवा सोफ्यावर आरामात पाय पसरून बसून रहाण्याच्या सवयीमुळे पुढे जाऊन वजन वाढतं, अपचन होतं किंवा पोट पुगल्यासारखं होतं. पण तुम्हाला माहितेय का, जेवणानंतर एक योग आसन केल्यामुळे अन्नपचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते?

तुम्ही असा विचार करत असाल की जेवणानंतर कोणतं आसन करणार? योगाभ्यास रिकाम्या पोटी करायचा असतो. अगदी बरोबर आहे तुमचं. पण, जेवणानंतर तुम्ही वज्रासन नक्कीच करू शकता किंवा वज्रासनात बसू शकता. यामुळे शरीराला खूप फायदे होतात.

चला आता जाणून घेऊया वज्रासन कसं करायचं आणि जेवण झाल्यानंतर वज्रासनात बसण्याचे काय फायदे आहेत.

वज्रासन कसं करायचं?

वज्रासनाला ‘Thunderbolt Pose or Diamond Pose म्हणूनही ओळखलं जातं. वज्रासन करण्याचे अनेक फायदे आहेत. खासकरून अन्नपचन योग्य पद्धतीने होण्यासाठी वज्रासन खूप महत्त्वाचं आहे. योगासनाच्या इतर आसनांप्रमाणे वज्रासन जेवणानंतर सहज करता येणं शक्य असल्याने याचे अनेक फायदे आहेत.

मॅट, कार्पेट किंवा बेडवर बसा. पाठ ताठ, पाय पुढच्या बाजूस सरळ, हाताचे तळवे कमरेच्या बाजूला असतील आणि बोटं पुढच्या दिशेने ठेवा.

उजवा पाय गुडघ्यात वाकवून मागे दुमडून उजव्या नितंब म्हणजेच buttock च्या खाली ठेवा. त्याचप्रमाणे डावा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या नितंब म्हणजेच buttock च्या खाली ठेवा.

लक्षात ठेवा या स्थितीत तुमच्या पायांचे अंगठे एकमेकांना जोडलेले असतील.

buttock किंवा कुल्हा पायांच्या टाचा आणि पायांच्या गॅपमध्ये असेल. मांड्या पोठऱ्यांवर स्थिरावलेल्या असतील.

हात गुडघ्यांवर ठेवा आणि पाठीचा मणका ताठ असूद्यात.

आता डोळे बंद करा आणि सामान्य श्वास घ्या. शरीर आणि मन पूर्णपणे रिलॅक्स किंवा शांत करा.

शेवटच्या पोझिशनमध्ये 5-10 minutes रहा. श्वास सामान्य सुरू असेल. डोकं आणि मान एका सरळ रेेषेत असतील.

आसन सोडताना थोडं उजव्या बाजूला शिफ्ट होऊन उजवा पाय काढून सरळ करा. त्याचप्रमाणे दुमडलेला डावा पाय सरळ करून रिलॅक्स करा.

वज्रासनाचे फायदे

आरोग्य विषयक तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर 10 मिनिटं चालल्यामुळे अन्नपचन चांगलं होण्यास मदत मिळते. त्याचसोबत शरीरातील सारखेचं प्रमाण नियंत्रित रहातं. त्याचप्रमाणे जेवण झाल्यानंतर वज्रासनात बसल्यामुळे अन्नपचनासाठी मदत मिळते. दुपारच्या जेवणानंतर वज्रासन करणं प्रत्येकाला शक्य होणार नाही. पण, रात्रीच्या जेवणानंतर वज्रासनात बसणं सहज शक्य आहे.

अन्नपचन सुधारतं

जेवणानंतर वज्रासन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात कारण यामुळे अन्नपचन क्रिया सुधारण्यास मदत होते. वज्रासनामुळे पचनप्रणालीला चालना मिळते आणि त्याचं कार्य सुधारतं. वज्रासन स्थितीत बसल्यामुळे रक्तप्रवाह पोट आणि आतड्यांकडे वळवला जातो. ज्यामुळे अन्नपचन क्रिया सुधारते.

रक्तपुरवठा प्रणालीचं कार्य सुधारतं

वज्रासन स्थितीत बसल्यामुळे ओटीपोटाच्या भागांना जास्त रक्तपुरवठा होतो. यामुळे अन्नातील पौष्टीक घटक शरीरात चांगल्या पद्धतीने शोषले जातात. शरीरातील गरज नसलेले पदार्थ बाहेर टाकले जातात आणि शरीर डीटॉक्सिफाय होण्यास मदत होते.

गॅसची समस्या कमी होते

जेवणानंतर वज्रासनात बसल्यामुळे गॅस आणि पोट पुगण्याची समस्या कमी होते. पोटातील गॅस आणि आतड्यातील गॅसेस बाहेर पडतात. बद्धकोष्टतेचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. अॅसिडीटीचा त्रास कमी होतो.

मानसिक आरोग्य

वज्रासन एक मेडिटेटिव्ह पोझिशन आहे. शरीर आणि मन शांत झाल्यामुळे स्ट्रेस कमी होतो.

वज्रासनाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे लोअर बॅकमध्ये त्रास असेल तर कमी होण्यास मदत मिळते. दिवसभर कामासाठी बसून राहिल्यामुळे लोअर बॅकवर स्ट्रेस येतो. वज्रासनामुुळे हा त्रास कमी होतो. वज्रासनामुळे मांड्या, पोठऱ्या आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात.

वज्रासन कोणी करू नये?

गुडघे आणि ankles ना दुखापत झाली असेल किंवा काही त्रास होत असेल तर अशा व्यक्तींनी वज्रासन टाळावं.

वज्रासन अत्यंत सोपं आसन आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरीकांपर्यंत कोणीही वज्रासन करू शकतं. जेवणानंतर वज्रासनात बसण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे यापुढे लक्षात ठेवा, जेवण झाल्यानंतर वज्रासनात बसण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुमची अन्नपचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.

((हे मी माझ्या अनुभवावरून लिहीलं आहे. योग प्रशिक्षकाशी बोलून तुम्ही ही आसनं करू शकता))

Leave a comment