मेंदूला चालना देणारी आणि श्वसनमार्ग शुद्ध करणारी कपालभाती क्रिया कशी करावी?

‘कपालभाती’ क्रिया योगाभ्यासातील शटकर्मांपैकी एक आहे. शरीर शुद्ध करण्यासाठी कपालभाती क्रिया केली जाते. योगाभ्यास करणाऱ्यांमध्ये कपालभाती खूप प्रसिद्ध आहे. श्रृषी घेरंड यांनी लिहीलेल्या घेरंड संहितेमध्ये याला भालाभाती असं म्हणण्यात आलंय. कपाल, किंवा भाल म्हणजे सोप्या भाषेत कपाळ आणि भाती म्हणजे प्रकाश. 

कपालभाती बाबत सांगताना ‘हठ योग प्रदिपिका’ या पुस्तकात स्वामी मुक्तिबोधानंद लिहीतात, ‘या क्रियेमुळे मेंदूला चालना मिळते आणि मेंदूतील सुप्त केंद्र जागृत होतात.’

सोप्या भाषेत समजावून सांगायचं झालं तर, कपालभाती म्हणजे कपाळाचा भाग शुद्ध करणे. आपण जेव्हा सामान्य पद्धतीने श्वासोच्छवास घेतो तेव्हा आपण श्वास जाणीवपूर्वक घेतो. पण श्वास सोडताना तो आपोआप सोडला जातो. कपालभाती क्रियेमध्ये या उलट, श्वास जाणीवपूर्वक सोडला जातो. पण, श्वास घेणं हे आपोआप घडतं. 

कपालभाती क्रिया कशी करावी? 

कपालभाती क्रियेमध्ये श्वास सोडण्याची प्रक्रिया ही जाणीवपूर्वक आणि जोराने केली जाते. पण श्वास घेण्याची प्रक्रिया ही आपोआप घडते. लोहाराचा भाता माहित आहे का तुम्हाला. ज्या प्रकारे लोहाराचा भाता काम करतो, अगदी त्याच प्रकारे कपालभाती क्रियेत होतं. श्वास जोराने बाहेर सोडला जातो पण श्वास घेणं आपोआप, नकळत घडतं.   

कपालभाती क्रियेसाठी जमिनीवर पद्मासन किंवा सुखासनात बसावं. हात गुडघ्यांवर आणि हाताचे तळवे वरच्या दिशेने असतील. हात चिन मुद्रेत ठेवले तरी चालतील. पाठीचा कणा ताठ असेल. खांदे सैल सोडलेले. डोळे बंद करून श्वास सामान्य होऊ द्यावा. 

सामान्य पद्धतीने श्वासोच्छवास घ्यावा. लक्ष श्वासोच्छवासावर केंद्रीत करावं. त्यानंतर एक दिर्घ श्वास घेत जोराने श्वास बाहेर सोडून द्यावा. 

दोन्ही नागपुड्यांनी श्वास वेगाने किंवा जोरात बाहेर सोडण्याची ही क्रिया एका तयबद्ध प्रकारात सुरु ठेवावी. पण श्वास बाहेर सोडत असताना श्वास घेणं हे आपोआप घडेल. हठ योग प्रदिपिकेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, श्वास घेण्याची प्रक्रिया नकळत आणि श्वास सोडण्याच्या प्रक्रियेमुळे घडली पाहिजे. 

कपालभाती करत असताना चेहऱ्याचे स्नायू सैल ठेवावेत. 

सुरावातील 10 स्ट्रोक करावेत. सरावानंतर याची संख्या हळूहळू वाढवावी. 

तुम्ही जेव्हा जोराने श्वास बाहेर सोडाल तेव्हा ओटीपोटाचे स्नायू आकूंचन पावतील. लक्ष ठेवा की श्वास सोडल्यानंतर श्वास घेण्याची प्रक्रिया नकळत घडते. 

कपालभाती क्रियेचा सराव केल्यानंतर डोळे बंद असताना कपाळावर एका प्रकारचा प्रकाश पहाण्याचा प्रयत्न करा.  

जास्त जोराने श्वास सोडल्यामुळे तुम्हाला त्रात होत असेल तर कपालभाती करणं काहीकाळ थांबवा. श्वास पुन्हा सामान्य झाल्यानंतर पुन्हा सुरू करा. पण, श्वास सोडतानाचा स्ट्रोक खूप जोरात करू नका.  

कपालभाती क्रिया लक्षपूर्वक केली पाहिजे. प्रत्येक स्टेप करताना अवेअरनेस महत्त्वाचा आहे. पहिला राउंड झाल्यानंतर एक दिर्घ श्वास घ्या. शरीरावर आणि मनावर या क्रियेचा काय परिणाम होतो हे पहा. 

कपालभाती क्रियेचे ५ फायदे काय? 

हठ योग प्रदिपिकेत दिलेल्या माहितीनुसार, कपालभाती क्रिया कफ नाशक मानली जाते. 

श्वसनमार्गाची शुद्धता होते. श्वसनमार्गात असलेले टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनची देवाण-घेवाण करणाऱ्या पेशी शुद्ध झाल्यामुळे खूप फायदा होतो.  

कपालभातीनंतर शरीर हलकं झाल्याचं जाणवतं. मन शांत होतं आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते.  

चेहऱ्याच्या भागात चांगल्या पद्धतीने रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पोहोचल्यामुळे चेहऱ्याची त्वचा चांगली होते.

चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स होतात. मुंबईच्या द योग इन्स्टिट्युटच्या माहितीनुसार, चेहऱ्याच्या भागातील पेशी आणि रक्तवाहिन्या पुनरूज्जिवित होतात. त्यामुळे चेहरा टवटवीत दिसतो. 

कपालभातील क्रियेमुळे चेहऱ्याच्या भागातील सायनस स्वच्छ होतात. ज्यामुळे मायग्रेन आणि सायनस अटॅक कमी होण्यास मदत मिळते. 

कपालभाती क्रिया मेडिटेशन करण्याच्या अगोदार केल्यास चांगला फायदा होतो. 

अनिमियाचा त्रास असेल तर ही क्रिया फायदेशीर आहे. 

कपालभातीचा सराव कोण करू शकतं? 

शाळकरी मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत कपालभाती क्रिया कोणीही करू शकतो. ही क्रिया अत्यंत सोपी आहे. आजारी असताना कपालभाती करणं टाळावं.  

कपालभातीचे वातक्रम, व्युतक्रम आणि शीतकर्म कपालभातील असे तीन प्रकार आहेत.

Screenshot

((Information source of the article: Hath Yoga Pradipika, The Yoga Institute and New Age Yoga))

Leave a comment