
Image by Elliot Alderson from Pixbay
Disease ‘X’.. अरे देवा..आता ही काय नवीन भानगड आलीये? कोव्हिड गेला? आता हा नवा येणार? पुन्हा घरी बसावं लागणार? सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर सुरू असलेल्या चर्चेनंतर प्रत्येकाला हा महत्त्वाचा प्रश्न पडलाय. कोव्हिड-19 महामारी अजूनही संपलेली नाही. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी, नव-नवीन व्हेरियंट जगभरात कुठल्या ना-कुठल्या शहरात अधूनमधून डोकं वर काढतातच. कोरोनानंतर आता कुठे जग पूर्वपदावर येऊ लागलंय. पण, त्यातच शास्त्रज्ञांनी Disease ‘X’ चा धोका असल्याचा अलर्ट दिलाय. पण Disease ‘X’ म्हणजे नक्की काय? हा नवा आजार आहे का? हे नाव कोणी दिलं? ही भानगड नेहमी आहे तरी काय?
Disease ‘X’ आजार आहे का?
Disease ‘X’ हे नाव जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पहिल्यांदा 2018 साली दिलं. त्यावेळी Disease ‘X’ बाबत WHO च्या डॉ बर्नाडेट म्युरुग यांना प्रश्न विचारण्यात आला.
त्या म्हणतात, “Disease ‘X’ नावाचा कोणताही आजार नाही. Disease ‘X’ ही एक संकल्पना आहे.”
2018 मध्ये जगभरात लाखो नागरिकांचे बळी घेणाऱ्या गंभीर किंवा प्राधान्य आजारांची WHO ने यादी तयार केली होती. या यादीत सर्वात शेवटी एक नाव जोडण्यात आलं होतं Disease ‘X’. यात दक्षिण अफ्रिकेत थैमान घालणारा इबोला आणि मरबर्ग व्हायरस डिसीज, झिका, लासा फिवर, निपाह, Middle East Respiratory syndrome आणि आता कोव्हिड-19 चं नाव जोडण्यात आलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ही लिस्ट संपूर्ण आहे किंवा इथेच संपली असं नाही. किंवा या आजारांमुळेच पुढची जागतिक महामारी येइल असंही ठामपणे सांगता येऊ शकत नाही. झपाट्याने पसरणारे आजार, या आजारासाठी कारणीभूत घातक विषाणू यांच्यावर अधिक संशोधन, लस निर्मिती, औषध निर्मिती यावर अभ्यास करण्यासाठी ही प्राधान्य आजारांची तयार करण्यात आलीये.
Disease ‘X’ आजार नाही. मग नक्की काय?
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर Disease ‘X’ म्हणजे जो अजूनही अदृष्य आहे किंवा ज्याची आपल्याला अजिबात माहिती नाही. WHO च्या माहितीनुसार, “Disease ‘X’ म्हणजे एक असा विषाणू ज्याबाबत फारशी माहिती नाहीये. या व्हायरसमुळे मनुष्याला धोका पोहोचू शकतो का? याबाबतही अजून ठोस माहिती उपलब्ध नाही.” पण हा विषाणू जागतिक महामारीसाठी कारणीभूत ठरू शकतो हे मात्र नक्की.” कोव्हिड-19 कडेही काही संशोधक Disease ‘X’ म्हणून पाहातात. कारण नव्या कोरोना व्हायरसबाबतही फारशी माहिती उपलब्ध नव्हती.
Disease ‘X’ बाबत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेड्रॉस म्हणतात, “आपल्याला माहितेय, कोव्हिड हा शेवटचा Disease ‘X’ नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. जेणेकरून जेव्हा पुन्हा Disease ‘X’ धडक देईल. त्यावेळी आपण याचा सामना करण्यासाठी तयार असू.”
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, Disease ‘X’ हा Zonotic Disease म्हणजे प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा असू शकतो. जिनेव्हामध्ये मे 2023 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत बोलताना डॉ. टेड्रॉस म्हणाले होते की, “जगाला कोव्हिडपेक्षा मोठ्या साथीचा सामना करावा लागू शकतो. ही महामारी गंभीर असू शकते.” डॉ. म्युरूग पुढे म्हणाल्या, याला प्लेसहोल्डर म्हणू शकतो. येणाऱ्या काळात एखादा नवीन आजार झपाट्याने पसरला किंवा ज्याबाबत माहिती नाही अशाचं संक्रमण सुरू झालं तर, लस निर्मिती, औषध याबाबत काय प्रयत्न करावे लागतील यावर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होईल.
Disease ‘X’ चर्चा का सुरू झाली?
Disease ‘X’ बाबत 2018 नंतर बरीच चर्चा झालीये. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत याचे संभाव्य धोके आणि तयारी यावर चर्चा करण्यात आली. पण काही दिवसांपूर्वी Disease ‘X’ पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला.
जगविख्यात संशोधक आणि यूकेच्या माजी व्हॅक्सिन टास्कफोर्स प्रमुख केट ब्रिंगहॅम यांच्या वक्तव्यामुळे. इकोनॉमिक टाईम्स माहितीनुसार, केट ब्रिंगहॅम यांनी आपल्या पुस्तकात येणाऱ्या काळात एक नवीन महामारी येऊ शकते असा धोक्याचा इशारा दिला आहे. यूकेच्या डेली मेल वृत्तपत्रात ब्रिंगहॅम त्यांच्या पुस्तकातील काही भाग छापण्यात आलाय.

Image by Freepik
यात लिहीलंय, “पुढची महामारी येत आहे. यात कोरोनामध्ये मृत्यूमुखी पडल्यापेक्षा जास्त लोकांचा बळी जाईल.” “1918-19 च्या स्पेनिश फ्लूच्या साथीत 50 लक्ष लोकांचा बळी गेला. आजच्या घडीला जे विषाणू आपल्या आजूबाजूला आहेत. त्याच्यामुळे लाखो लोक बळी पडू शकतात.”
केट ब्रिंगहॅम यांनी लस विशेषज्ञ टीम हॅम्स यांनी The Long Shot या पुस्तकात येणाऱ्या महामारीबाबत आपलं मत व्यक्त केलंय. ‘विचार करा, येणारी महामारी Measel (गोवर) सारखी तीव्रतेने पसरणारी आणि इबोलासारखी जीवघेणी असेल तर.’ ही महामारी सजह नियंत्रणात येईल असं मानून चालणार नाही. जगातील कोणत्यातरी कानाकोपऱ्यात हा आजार वाढतोय. आता किंवा काही वेळाने यामुळे लोक आजारी पडू लागतील, असं त्यांनी पुढे लिहीलंय.
Disease ‘X’ शास्त्रज्ञांसमोर मोठं आव्हान?
Disease ‘X’ जगभरातील संशोधकांसमोरचं एक मोठं आव्हान आहे. याचं कारण याबाबत काहीही माहिती उपलब्ध नसणे. Johns Hopkins Bloomberg School of Public Health चे डॉ. प्रणब चॅटर्जी यांनी
Disease ‘X’ आव्हान का आहे? याबाबत एक प्रझेन्टेशन तयार केलंय. यात डॉ. चॅटर्जी म्हणतात,
- आपल्या आजूबाजूला 25 विविध प्रकारच्या व्हायरस फॅमिली आहेत. ज्यामुळे माणसांना संक्रमण होण्याची भीती आहे.
- एका अंदाजाप्रमाणे 1.67 दशलक्ष असे विषाणू आहेत. ज्यांच्याबाबत अजिबात माहिती उपलब्ध नाही.
- अंदाजे 631,000 to 827,000 आहेत ज्यांच्यात माणसांना संक्रमित करण्याची क्षमता आहे.
डॉ. चॅटर्जी यांच्या अंदाजाप्रमाणे, Disease ‘X’ देखील झुनॉटिक (Zonotic) असण्याची शक्यता आहे. ते पुढे म्हणतात, 1935 ते 2004 या काळात 335 विषाणू आढळून आले. यातील 60 टक्के झुनॉटिक म्हणजे यांचा उगम प्राण्यांपासून झाला होता. त्यांचा अंदाज आहे की
Disease ‘X’ tropical म्हणजे उष्णकटिबंधीय किंवा LMIC settings मध्ये ज्याठिकाणी जैवविविधता खूप आहे अशा परिसरात उत्पन्न होऊ शकतो.
Disease ‘X’ साठी संशोधन किती महत्त्वाचं?
Disease ‘X’ संशोधकांना अजिबात माहिती नाही. त्यामुळे यावर संशोधन अत्यंत महत्त्वाचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात तीव्र आजार पसरवणारे विषाणू अनेक आहेत. पण त्या तुलनेत आजारांबाबत संशोधन फार कमी. त्यामुळे आपल्याला माहिती असणाऱ्या आजारांबाबत संशोधन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठीच WHO ने 25 विविध प्रकारच्या व्हायरस फॅमिली आणि जिवाणू आणि Disease ‘X’ यांच्यावर संशोधनासाठी 300 शास्त्रज्ञांचा एक अभ्यास गट तयार केलाय.
हे तज्ज्ञ डॉक्टर आणि संशोधक कोणत्या विषाणूंवर अभ्यास जास्त करायला हवा याबाबत मार्गदर्शन करतील. बीबीसीच्या माहितीनुसार ब्रिटीश सरकारने Disease ‘X’ चा मुकाबला करण्यासाठी संशोधन सुरू केलंय. प्रयोगशाळेत कोव्हिडसोबत विविध विषाणूंवर संशोधन सुरू झालंय. 200 पेक्षा अधिक शास्ज्ञत्र विविध आजारांवरील लस निर्मितीवर लक्ष केंद्रीत करत आहेत.
कोरोनाच्या महामारीचा धोका सर्व जगाने अनुभवलाय. यात लाखो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनो, इबोला, मरबर्ग किंवा स्वाईन-फ्लू सारख्या आजारांचा उगम प्राण्यांपासून होऊन त्यानंतर याचा संसर्ग माणसांना झाला. संशोधकांच्या मते, यापुढेही अशा प्रकारच्या व्हायरसला तोंड देण्यासाठी आपल्याला सज्ज रहावं लागेल आणि मुकाबला करण्यासाठी लस आणि औषध संशोधनावर भर द्यावा लागेल.